''यह एक शैक्षिक ब्लॉग है, यहाँ बालक-पालक-शिक्षक आदि के लिए उपयुक्त जानकारी है. आपसे अनुरोध है कि जहाँ आवश्यकता है वहाँ तक पहुँचाने में सहायता करें।"

स्वागत

'मच्छिंद्र बापू भिसे, शिक्षण सेवक, जिला परिषद् हिंदी वरिष्ठ प्राथमिक पाठशाला, विचारपुर द्वारा हार्दिक स्वागत! संपर्क 9730491952 "

Thursday, 20 March 2025

वय वर्ष ५९ - ‘झुकेगा नहीं साला’

वय वर्ष ५९ - ‘झुकेगा नहीं साला’ अंतराळ कन्या - सुनिता विल्यम 


सुनिता विल्यम अंतराळातून परतली, ही वर्तमानपत्रातील बातमी वाचली आणि मनापासून आनंद झाला. कारण २८६ दिवस अंतराळात राहूनही तिच्या चेहऱ्यावरील हास्य! आता तुम्ही म्हणाल त्यात काय आनंद! खरं तर आपण भारतीय वंशाची पहिली महिला अंतराळवीर म्हणून अभिमान बाळगतो आणि बाळगायला ही हवा. पण त्या पलीकडेही ती एक माणूस म्हणून वेगळ्या अंतर्मनाने पाहणे योग्य ठरेल असे मला वाटते.

मी जेव्हा ही बातमी वाचली तेव्हा माझ्या मनामध्ये वेगळ्या प्रकारच स्मितहास्य उमटले आणि विचार आला की वयाच्या ५८ व्या वर्षी सेवानिवृत्ती घेवू पाहणारे; कदाचित निवृत्तीची वाट पाहणारी माणसं एका बाजूला व वयाच्या ५८ व्या वर्षी अंतराळात वैज्ञानिक प्रयोग करण्यासाठी वय, लिंग, वर्ण, जात इत्यादी व पृथ्वी, नातलग व आपली माणसं सोडून विसरून जीवघेण्या प्रवासाला जाणारी व त्याच जोशात, आनंदात २८६ दिवस वेगळ्या विश्वात राहून परत येणारी ५९ वर्षीय सुनिता विल्यम दुसऱ्या बाजूला. किती फरक आहे या दोघांमध्ये? एक मात्र नक्की निवृत्ती व या प्रवासाच्या वयामध्ये, मात्र शून्य!

पण वैचारिक व मानसिक पातळीवर पाहिलं तर.....! फरकच, फरक दिसेल. आधुनिकतेच्या काळात वावरणारे, आजच्या स्वैर जीवनशैलीत जगणारे, ‘झुकेगा नहीं साला’ म्हणणारे ५८ व्या वर्षीच निवृत्त होऊन आता माझे काम झाले, आता ही जबाबदारी कोणीतरी दुसऱ्याने घ्यावी असे म्हणतात व निवांत होतात. खरं तर हा निवांतपणाच हळू-हळू मरणाच्या व जीवनाच्या निवृत्तीच्या वेशीवर घेवून जातो, हे सुज्ञ, विद्वान लोकांना का समजत नाही, हा मला पडलेला प्रश्न आहे.

आपण जरा सुनिता विल्यमला अंतराळवीर म्हणून थोडं बाजूला ठेवूया आणि विचार करूया, एक व्यक्ती म्हणून. माणूस म्हणून प्रत्येकाची कार्यक्षमता, आरोग्य, बौद्धिकता आणि बऱ्याच गोष्टीमध्ये जरी अंतर असले तरी जन्म, वय व मृत्यू हा माणूस म्हणून प्रत्येकालाच समान आहे. मग आपल्या क्रयशीलतेमध्ये अंतर का जाणवते? काही लोकं निरंतर काम करत राहतात तर काही ठराविक अंतरावर थांबतात. हे थांबणं खटकत नाही का? ‘थांबला तो संपला’ हा प्रत्येकाला उपदेश देणारा प्रत्येक माणूस एका ठराविक टप्प्यावर आल्यावर स्वतःच थांबतो आणि स्वतः किती खोटारडा आहे हे ही सिद्ध करतो. स्वतःच्या नजरेतही नजर मिळवू शकत नाही, यामध्ये वैचारिकतेचा स्तर कमी असणाऱ्यांना या गोष्टीचा काहीहे फरक पाडत नाही, त्यांना आपण काय म्हणतो...निर्ल.....!

असोत, स्वतःच्या नजरेतून उतरण्यापूर्वी प्रत्येक व्यक्ती हा विचार का करत नाही की जीवनाची ‘ही वाट दूर जाते.’ तिला वळणे आहेत; पण शेवटचं स्टेशन मात्र कोणालाच माहित नाही. मग गाडी पंक्चर झाल्यानंतर तिला कुजवत न ठेवता दुरुस्त करून पुन्हा वाटेवर आणणारे आपण मात्र प्रत्यक्ष जीवनात वयाचा स्पीडब्रेकर असा लावतो की आता सर्व संपलं. खरं तर जेव्हा थांबण्याचा विचार ज्या क्षणी आला त्याच क्षणी तुमचे मानसिक, बौद्धिक व शारीरिक वय व जीवन संपलेलं असतं फक्त नावालाच जगणारे उरलेले असता. मग फक्त बघत रहायची वाट, जीवनाची वाट संपण्याची. हे समजायला काय वयाची गरज आहे का?

मला असं वाटतं की आपली मानसिकताच याला कारणीभूत असावी. ज्याचे मन कणखर, त्याचे कितीही वय झालं तरीही तो तरुण राहतो व जीवनाच्या प्रत्येक घडीला तो तरुन जातो. प्रत्येकाचं शारीरिक वय वाढतच जातं, पण मनाने कणखर असणारी लोकं मात्र मानसिक वयानं चिरतरुण होत जातात. यांच्या जीवनामध्ये आनंदाचा, समाधानाचा वर्षाव नेहमीच होत राहतो आणि हे त्याच्या उपस्थितीत त्यांच्या चेहऱ्यावर व जीवनशैलीमध्ये दिसून येतं. आपल्याला असं जगता आलं तर जगल्याचा आनंदही नक्की मिळेल.

सुनिता विल्यमचा आजचा वर्तमानपत्रातील फोटो पाहिल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरचं तारुण्य तिच्या वयाशी कधीही बरोबरी करू शकणार नाही. कदाचित ५९ व्या वर्षाला तिच्या या चिरतरुण हास्यावर कदाचित ईर्ष्या ही झाली असेल. खरं आहे ना! माझ्या प्रत्येक सोबत्याला असच चिरतरुण पाहायला मला आवडेल. तुम्हालाही स्वतःला चिरतरुण राहायला आवडेल का? जर हो असेल तर आपण हाती घेतलले कार्य शेवटचा श्वास असे पर्यंत आत्मविश्वासाने, मानसिक कणखरतेणे करूयात. नक्कीच आपल्याही जीवनात आणि चेहऱ्यावर आनंदाचे चिरयौवन आलेले पाहायला मिळेल, तेव्हा आपण आत्मविश्वासाने म्हणू शकतो- ‘झुकेगा नहीं साला.’

सुनिता विल्यमच्या या ५९ व्या वर्षी तिने यशस्वी केलेल्या मोहिमेतून एक मात्र नक्की शिकता येईल ते म्हणजे क्रयशीलतेला वय नाही. शिकण्याला वय नाही तसच कार्यरत राहण्यालाही वय नसतं हे सुनिता विल्यामच्या या मोहिमेतून दिसून येते. निवृत्तीला वय नाही ही वृत्तीच आपण जोपासायला हवी. आपण निवृत्त होणारच नाही या विचाराची व विश्वासाची खुणगाठ नक्की बांधू शकतो. प्रयत्न तर नक्कीच करूयात!

धन्यवाद!
-0-
लेखन व शब्दांकन:
श्री. मच्छिंद्र बापू भिसे,
सेवार्थ: विचारपूर, गोंदिया (महाराष्ट्र)
मूळ निवास: भुईंज, सातारा (महाराष्ट्र)
मो. ९७३०४९१९५२

● मच्छिंद्र बापू भिसे 'मंजीत'● ©®
शिक्षण सेवक
जिला परिषद हिंदी वरिष्ठ प्राथमिक पाठशाला, विचारपुर, जिला गोंदिया (महाराष्ट्र)
9730491952
सातारा (महाराष्ट्र)


https://drive.google.com/drive/folders/1sRO4lvknu9V_Yr32CcPPCffos-THPbPY



No comments:

Post a Comment